जीपीएस रिपोर्ट नसतानाही काढली कोट्यवधींची बिले

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नवीन योजनेद्वारे मिळणारे वाढीव २०० एमएलडी पाणी लांबल्याने कंत्राटदारांना यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा खोर्‍याने पैसा ओढण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी जीपीएस रिपोर्ट नसतानाही कंत्राटदरांची कोट्यवधीची बिले काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २५०० मिमी व्यासाची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने (एमजेपी) हे काम हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला दिलेले आहे. जायकवाडी धरणातील पाणी नक्षत्रवाडी येथे आणण्यासाठी ३८ किमी लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीचे थोडे काम बाकी आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पही पूर्णत्वास आलेला आहे. या योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी ५५ जलकुंभ बांधण्यात येत असून, यातील २२-२५ जलकुंभांचे काम सुरू आहे. योजना पूर्ण झाल्यावर शहराला दररोज ४०० एमएलडी पाणी मिळणार आहे.